धर्म की धर्मापलिकडे ?-आ.ह.साळुंखे

“धर्म की धर्मापलिकडे? “ या पुस्तकात डॉ.आ.ह साळुंखे यांनी धर्म,त्याचे स्वरूप,निर्मिती ,उपयुक्तता,धर्मापलिकडे जाण्याची कारणे , त्यातील अडथळे आणि त्यावरील उपाय याबाबतची विस्तृत,मुद्देसूद,प्रवाही आणि प्रभावी मांडणी केली आहे .
धर्माच्या निर्मिती पासून ते धर्मापलिकडच्या विज्ञान आणि विवेकापर्यंतचा प्रवास आ.ह.या पुस्तकामध्ये वाचकाला घडवतात.कार्यकर्त्याला किंवा कोणत्याही विवेकी माणसाला समाज नेहमी प्रश्न करत असतो.धार्मिक भावनांच्या प्रश्नामध्ये काम करणार्‍या माणसाला तर हमखास सर्वांसमोर “तुमचा देवधर्मावर विश्वास आहे का ?” हा प्रश्न विचारला जातो . फक्त स्वत:चा विचार दामटवायचा म्हटलं तर या प्रश्नाचे उत्तर एका शब्दात हो किंवा नाही असे देणे खूप सोपे आहे.परंतु व्यापक समाज परिवर्तनाचा विचार कराल तर श्रोत्यासमोर या प्रश्नाची नीट मांडणी करता आली पाहिजे.त्यासाठी कार्यकर्त्याच्या डोक्यात या विषयाचे सखोल ज्ञान आणि माहिती दोन्ही असणं गरजेचे आहे .“मी धर्मापलिकडे गेलेला माणूस आहे म्हणून मला धर्म समजून घ्यायची गरज नाही “असा विचार करणारा माणूस कधीच जनसामन्यांच्या मनापर्यंत पोहचू शकणार नाही .धर्मापलिकडे जायचे असेल तर धर्म समजून घेतला पाहिजे.त्यापलिकडे जाण्यातील व्यावहारिक आणि भावनिक अडथळे समजून घेतले पाहिजेत.पलिकडचा तीर सुंदर वाटून धर्माची नदी ओलांडण्याची वाचकाला स्वत: ला इच्छा झाली पाहिजे.कदाचित याच उद्देशाने या पुस्तकाचा घाट आ.ह . यांनी घातला असावा .
हे पुस्तक वाचताना मी एक गंमत केली . हे पुस्तक वाचण्याआधी शाळेत असतानाच “धर्म की धर्मापलिकडे ?“ या अर्थाचा प्रश्न मला पडला होता.माझ्या परीने विचार करून , नंतर चकवळींशी संबंध आल्यावर वाचन आणि जीवनानुभव यांच्या समन्वयाने धर्मापलिकडच्या दिशेने मी प्रवास केला.परंतु “मी निधर्मी आणि नास्तिक माणूस आहे” असं डोक्यात घेऊन मी हे पुस्तक वाचले तर मला हे पुस्तक अनुभवता येणार नाही असे मला वाटले.आधीच माहीत असलेली माहिती वेगळ्या शब्दात वाचणार आहोत असा समज उगीचच मनात तयार होत होता.असा विचार केल्याने “धर्म की धर्मपलीकडे ?” हा प्रश्न आणि त्यातला गुंता मला समजूनच घेता आला नसता.म्हणून हे पुस्तक वाचताना मी मनात असे गृहीत धरले की मी एक धर्मावर अत्यंत श्रद्धा असणारा माणूस आहे.त्यामुळे मला खूपच मजा आली.धर्म की धर्मपलिकडे ? हा प्रश्न मला पुन्हा जगता आला.एखाद्या धार्मिक माणसाचा हे पुस्तक वाचताना धर्मापलिकडे आणि त्याही पुढे प्रकाशाकडे होणारा प्रवास मला अनुभवता आला . काही काही परिच्छेद मी स्वत:ला कट्टर धर्मांध गृहीत धरूनही वाचले.जिथे धर्मातील सकारात्मक बाजू मांडली आहे तो भाग मी स्वत: ला निधर्मी समजून वाचून बघितला.या पुस्तकाचा प्रत्येक भाग मी वेगवेगळ्या भूमिकांमध्ये जाऊन वाचून पाहिला आणि प्रत्येकवेळी तो मला नव्याने समजत आणि भिडत गेला .माझी जाण या पुस्तकाने वाढवली.
सुरवातीलाच आ .ह. एका महत्वाच्या मुद्दयाकडे लक्ष वेधतात . तो म्हणजे शाब्दिक गैरसमज.धर्म हा शब्द आपण कोणत्या संदर्भात वापरतो हे बोलताना माहीत हवे.“खरा तो एकची धर्म , जगाला प्रेम अर्पावे “म्हणणारे साने गुरुजी जगावर प्रेम करण्याला धर्म मानत होते.परंतु कर्मकांड आणि रूढीप्रचलित धर्माला त्यांनी विरोधच केला.अनेकदा या शाब्दिक गोंधळामुळे संघर्ष निर्माण होतो.तो आपण जाणीवपूर्वक टाळला पाहिजे. असे संघर्ष टाळण्यासाठी या दोन अर्थासाठी आशयनुरूप वेगवेगळ्या संज्ञा शोधून काढण्याची गरज आहे .
धर्म की धर्मापलिकडे? या प्रश्नाचा विचार करायचा असेल तर आधी धर्माचे स्वरूप,त्याचा अर्थ समजून घ्यायला हवा.धर्म निर्माण व्ह्यायच्या आधी आदिमानव काळात सुद्धा माणसाचे स्वत:च्या अस्तित्वावर प्रेम होते.परंतु रोगराई , वादळे , अतिवृष्टी ही प्रतिकूलता तेव्हा जास्त होती.या संकटातून वाचण्यासाठी,आत्मसंरक्षणासाठी,दुबळेपणाच्या जाणिवेतून निर्माण झालेल्या भीतीमुळे धर्माची निर्मिती झाली.या भीतीमुळे या सृष्टीमध्ये मानवापेक्षा अति प्रचंड बळ असणार्‍या शक्ती अस्तित्वात आहेत आणि त्यांना प्रसन्न केले तर त्या आपल्या अस्तित्वावर संकट आणणार नाहीत असा विचार आदिमानवाच्या मनाने केला.त्या शक्तीला प्रसन्न करण्याचे साधन म्हणून मग पुढे धर्म अस्तित्वात आला.या साधनामुळे त्या काळात त्याची भीती नाहीशी झाली अशी मांडणी आ.ह. करतात.
परंतु पुढे धर्माची गुंतागुंत वाढली.काही चांगल्या गोष्टी जरी धर्मात असल्या तरी कार्यकारणाविषयीचे अज्ञान , नव्या ज्ञानासाठी मनाचे दरवाजे बंद ठेवणे,शरणागतीची सवय , धार्मिक मुलभूततावाद,पुनरुज्जीवनवाद,दुटप्पीपणा , पावित्र्याची संकल्पना आणि त्यातून निर्माण होणारी विषमता, हिंसाचार,हुकुमशाही ,ढोंगबाजी,असमानता असे काही गंभीर दोष त्यात उत्पन्न झाले.धर्मातील चांगल्या गोष्टींच्या तुलनेत त्यातील दोषांची संख्या वाढली.चांगलं सुखकर जीवन जगण्यासाठी धर्मापलिकडे जाण्याची गरज निर्माण झाली .
परंतु धर्मापलिकडे जाऊन प्रवास करणे हे बोलयला आणि लिहायला जितके सोपे आहे तितके आचरणात आणायला सोपे नाही. ती अनेक अडथळ्यांची शर्यत आहे. शतकानुशके धर्माच्या आधारावर माणूस जगत आला आहे.त्याचा आधार घेत आलाय.तो आधार एकाएकी काढून घेतला तर माणूस खचून जाईल.त्याला मानसिक अपंगत्व येण्याची शक्यता आहे.धर्मापलिकडचे जग माणसाला दाखवायचे असेल तर पर्यायी व्यवस्था निर्माण केली पाहिजे.प्रसार माध्यमांचा सुयोग्य पद्धतीने वापर केला पाहिजे. शिल्पकला,चित्रकला,नाट्य, संगीत या मार्गाने जनतेचे प्रबोधन केले पाहिजे.सामान्य माणसाच्या जीवनातील अनेक महत्वाचे आणि आनंदी किंवा दुखा:चे प्रसंग,उदाहरणअर्थ ,सहजीवनाची सुरवात,मृत्यू हे सध्या धर्माने व्यापलेले आहेत .या आनंदी आणि दु:खी दोन्ही प्रसंगी धर्म त्यांच्यासोबत आहे.माणसाला त्याचा आधार आहे . धर्मापलिकडे गेल्यावर मात्र हा आधार तुटणार असेल तर पर्यायी आधारव्यवस्था आपण त्याच्यासाठी तयार ठेवली पाहिजे असे आ.ह.साळुंखे यांना वाटते .
धर्मापलिकडे जायचे असेल तर त्याच्या स्वरूपाचा , सामर्थ्याचा,बलस्थांनांचा गंभीरपणे अभ्यास केला पाहिजे. धर्मपलिकडे जाण्याचा पर्याय एखाद्याला देताना कोरड्या युक्तिवादापेक्षा जिव्हाळ्याने संवाद साधायला हवा,तसेच समाज बांधणारे धर्मापलिकडचे घटक आपण विकसित करायला हवेत,असे आ.ह मांडतात .
पुढे धर्म आणि विज्ञान याची तुलनात्मक मांडणी करून दोन्हीतल्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजू आ. ह .वाचकाला जाणवून देतात.स्वत: चा विवेक वापरुन धर्माचे क्षेत्र काही बाबींपुरतेच मर्यादित ठेवावे आणि विज्ञानाच्या मर्यादा जाणून त्यातल्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करावा,आणि या आधाराने मानवी जीवन आनंदाने ओतप्रोत भरण्याचा प्रयत्न करावा असं आ.ह. सुचवतात. तुलना करताना एका ठिकाणी विज्ञान म्हणजे अविकसित धर्म आणि धर्म म्हणजे विकसित विज्ञान अशी एक भूमिका आ .ह. यांनी मांडली आहे .ही भूमिका मांडताना त्याच्या अल्याड पल्याड व्यवस्थित विवेचन केले आहे .त्या विवेचनासहित वाचलं तर या भूमिकेचा आदरच आहे.परंतु आताच्या काळात “ विज्ञान म्हणजे विकसित धर्म “ असे स्टेटमेंट केल्याने समजापेक्षा गैरसमज जास्त होण्याची शक्यता आहे.विवेचनाकडे दुर्लक्ष करून खपणारा माल (स्टेटमेंट) विकायचा अशी काही प्रसारमाध्यमांची सध्याची दुर्दैवाने भूमिका आहे.“ सगळेच विज्ञान धर्मात सांगितलं आहे” अशी आवई आधीच सनातनी मंडळी उठसुट उडवत आहेत.आपले असे स्टेटमेंट त्यांच्या पथ्यावरच पडेल.तेव्हा अशी स्टेटमेंट करणं आपण आताच्या काळात टाळल पाहिजे असं मला वाटतं.
पुढे हिंदू मुसलमान-संघर्ष की सलोखा? या विषयी लिहिताना, संघर्षच करायचा म्हटला तर आपण आपल्याकडेचे पर्याय किती खुजे आणि अर्धवट आहेत याची जाणीव ते आधी करून देतात .सामंजस्य आणि संवाद याच्या आधारावर सलोखा प्रस्थापित करण्याचा पर्याय समोर ठेवतात.समान नागरी कायद्याची मागणी केली पाहिजे,भारताच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात सहभाग घेतला पाहिजे अशी अपेक्षा भारतीय मुस्लिमांकडून आ .ह. करतात.हे सांगताना भारतात फोफावणार्‍या जहाल हिंदुत्वावर ते प्रखर टीका करतात . “ हिंदूराष्ट्राची ब्लुप्रिंट काय ?” असं सडेतोड सवाल ते हिदुत्ववाद्यांना करतात.
समारोपात आ .ह. सांगतात की परंपरेपेक्षा युगधर्म महत्वाचा . नव्या युगात प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या आधारे जुन्या परंपरांची चिकित्सा करणे आणि नव्या मूल्यांची रुजवात करणे हे समाजाच्या जिवंतपणाचे लक्षण आहे.ज्ञानेश्वर,तुकाराम , शाहू,फुले,आंबेडकर या सर्वांना समाजाने त्रास दिला परंतु काळाच्या ओघात यांचे द्रष्टेपण सिद्ध झाले,याची आठवण ते करून देतात.त्याचसोबत धर्मांध शक्तींचा जोर वाढत असताना पुरोगामी चळवळी कमालीच्या विस्कळीत झाल्या आहेत अशी खंत आ .ह. समारोपात व्यक्त करतात .परिवर्तनासाठी झटणार्‍या अनेक संघटना,लोक देशभर गावागावात आहेत . या सर्वांनी किमान मुद्द्यांवर संघटित व्ह्यायला हवे अशी अपेक्षा व्यक्त करतात .
“ तमसो मा ज्योतिर्गमय,मृत्योर्मा अमृतम गमय “ या प्रार्थनेचा आधार घेऊन आ.ह. शेवटी म्हणतात,की आम्हाला अज्ञान नको,आम्हाला द्वेष नको.आम्हाला प्रकाश हवा .आम्हाला माणुसकी हवी आहे.ओठाओठांवर प्रसन्न आणि मधुर स्मितहास्य आणि हृदयाहृदयामध्ये उत्कट आनंदाचा झरा हवा आहे.धर्म आमच्यासाठी हे सर्व करत असेल तर तो आमचा मित्र. तो आम्हाला हवा.मग आम्ही त्याच्या पलिकडे जाण्याची भाषा करणार नाही.तो हे करणार नसेल तर आम्ही त्याच्या पलिकडे जाण्याचा हर तर्‍हेने प्रयत्न करू.असे साधे “ धर्म की धर्मापलिकडे?” या प्रश्नाचे उत्तर आहे असे आ.ह.साळुंखे सांगतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *