भारतातील धर्म : सहिष्णुता आणि विलग्नता

Pew Research Center या अमेरिकन संस्थेने नुकताच एक फार महत्वाचा सर्वे पूर्ण केला. या सर्व्हेतून त्यांनी भारतीय समाजमनातील अस्मिता, राष्ट्रवाद,सहिष्णुता इत्यादी बाबींचा अधिक खोलवर, वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या देशाचे सध्या जे राजकीय, सामाजिक चित्र दिसत आहे, त्यामागे भारतीयांची कोणती मते,समज, श्रद्धा, अंधश्रद्धा कारणीभूत आहेत याची चांगली कल्पना या सर्वेतून येते. मूळ सर्वे बराच मोठा व इंग्रजीत आहे. माझ्या नास्तिक मित्र-मैत्रिणींना महत्वाची वाटेल अशी माहिती मी इथे मराठीत देत आहे. ज्यांना संपूर्ण सर्वे बघायचा आहे ते या लिंकवर बघू शकतात.

Key findings about religion in India

https://www.pewforum.org/wp-content/uploads/sites/7/2021/06/PF_06.29.21_India_topline.pdf

९७% लोकांनी त्यांचा देवावर विश्वास असल्याचे सांगितले. जवळपास ८०% लोकांनां देव असल्याची पूर्ण खात्री आहे.

बरेच लोक इतर धर्मांच्या प्रथा पाळतात. बिंदी लावणे ही प्रथा स्वतःच्या समुदायात नसली तरी २९% शीख, २२% ख्रिश्चन, १८% मुस्लीम स्त्रीया बिंदी लावतात. कर्म संकल्पनेवर हिंदूंइतकीच मुसलमानांचीही श्रद्धा आहे(जवळपास ७७%). आणि ७% हिंदू ईद सारखे मुस्लिमांचे सण व १७% हिंदू ख्रिश्चनांचे ख्रिसमस सारखे सण साजरे करतात. गंमत म्हणजे गंगेच्या पाण्यात खरंच पाप धुण्याची शक्ती आहे असं २६% मुस्लीम आणि ३२% ख्रिश्चनांना पण वाटतं.

प्रत्येक धर्मात धर्मांतर करुन येणाऱ्यांची व धर्म सोडून जाणाऱ्यांची संख्या जवळपास सारखीच आहे. लव्ह जिहाद, घरवापसी करुन कोणाचीही संख्या वाढत नाही आहे. थोडक्यात, कोणताच धर्म ‘खतरे में’ नाही आहे.

रामासाठी या देशाने बरीच किंमत मोजली असली तर सर्वात पॉप्युलर देव मात्र शंकरजी आहेत. दुसरा नंबर हनुमानचा व तिसरा परत गणपतीचा (इथेही घराणेशाही) लागतो.

जातीचा प्रश्न सर्वच धर्मांत गंभीर आहे. सर्व धर्मातील ७०% लोकांचे जवळचे मित्र-मैत्रिणी हे त्यांच्या जातीमधलेच आहेत. ६४% पुरुषांच्या मते त्यांच्या जातीतील स्त्रियांनी इतर जातीतील पुरुषांशी अजिबात लग्न करता कामा नये. गंमत म्हणजे ६२% स्त्रियांचेही पुरुषांबाबत हेच मत आहे.

एखादी व्यक्ती जर देव मानत नसेल तरीही त्या व्यक्तीला हिंदू मानायला ४९% हिंदू तयार आहेत, पण बीफ खाणारी व्यक्ती हिंदू असूच शकत नाही असे ७२% हिंदूंचे म्हणणे आहे. मुस्लिमांमध्ये देव न मानणारी व्यक्ती पण मुसलमान असू शकते असं मानायला ६०% मुस्लिम तयार आहेत, पण डुकराचे मांस खाणारी व्यक्ती मुसलमान असूच शकत नाही असं ७७% मुसलमानांना वाटतं.

आनंदाची गोष्ट म्हणजे ८४% भारतीयांना इतर धर्मांचा आदर करणे हा भारतीय असण्याचा महत्वाचा घटक आहे असे वाटते. ८०% भारतीयांना इतर धर्मांचा आदर करणे हा त्यांच्या स्वतःच्या धर्मपालनातील महत्त्वाचा भाग वाटतो.

तुम्ही देव मानता का असा प्रश्न विचारल्यावर फक्त हिंदूंमधील २% लोकांनी ते देव मानत नसल्याचे तर मुस्लिमांमधील ६% लोकांनी ते देव मानत नसल्याचे सांगितले. शिखांमध्येही देव न मानणाऱ्यांचे प्रमाण ६% तर बौद्धांमध्ये ३३% आहे.

एकंदरीत भारतातील लोक असहिष्णू व कट्टर नसले तरी त्यांना स्वतःचे वेगळे असणे जपतच एकत्र रहायचे आहे असे या सर्वेवरून दिसते आणि नास्तिकांचे चांगले दिवस मात्र फारच दूर असल्याचे दिसत आहे. सर्वांनी वेळ काढून एकदा तरी या सर्वेचे निष्कर्ष वाचावेत असे मी सुचवेन.

—————————————-

Pew Research Center विषयी थोडक्यात: ही संस्था भारतीय नसल्याने भारतातील सर्व राजकीय प्रभाव आणि दबावापासून मुक्त आहे, दुसरं म्हणजे Pew स्वतः एक निःपक्षपाती असणारी , धोरणात्मक भूमिका न घेणारी संस्था आहे. त्यांची सर्वेची पद्धत अत्यंत आधुनिक व वैज्ञानिक असण्याकडे त्यांचे बारीक लक्ष असते. वर्तमानपत्र, न्यूज चॅनेल्सवरील बातम्या, विश्लेषण, चर्चांपेक्षा हा सर्वे कितीतरी पटीने अधिक अभ्यासपूर्ण व विश्वासार्ह आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *